ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो
आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भेटलो होतो
आठवतायंत का तुला आपल्या नजरांमधील कोडी
...
प्रश्न होते खूप पण वेळ होती थोडी
माझ्यापेक्षा तू माझ्या शब्दांवर भाळली होतीस
मनात होती वादळं पण अबोली माळली होतीस
आठवतायेत का तुला ते धुंदावलेले गंध
शपथांच्या खेळातले ते लोभसवाणे छंद
एकांतीचे शब्द शांततेनी खोडले होते
जसे मेघांनी ग्रीष्माचे संसार मोडले होते
मग एकदा असाच तू केला होतास फोन
मौनाच्या पडद्याआड रडलं होतं कोण?
मी रडलो नाहीच फक्त हसलो खिन्न
व्यथा होती एकच पण कथा होत्या भिन्न
पत्त्यांचा बंगलाच तो कधीतरी पडणार
एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा पडणार
आता जपून ठेव हे आयुष्यभराचं वाक्य
नियतीचं प्रेमाशी जमत नाही सख्य
अक्षता झेलत झेलत संसारात रमायचं
टाचांना कुरवाळत नभाशी बोलायचं
मळभ होईल दूर विरून जातील मेघ
आकाशीचे ग्रह घेतील पुन्हा वेग
दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर
तात्पर्य नसतं अश्या कथेला कधीच नसतो 'नंतर'
हळद मेंदी, सनई तिघी एकत्र नांदल्या
कवितेनं व्यथा सा-या सहीपाशी सांडल्या ...!
No comments:
Post a Comment