Friday, February 10, 2012

पिसे पहाटेचे.....



....................पहाटे थंडीच्या
.................... हिरव्या रानात
................... ऐने चमकती
................... कशिदा कामात

पहाटे रानात
वारा काकडला
स्वस्थ पहुडला
झाडा झुडपात

................ पहाटे नदीच्या
................. अंगावर कोणी
................. मऊ पांघरली
................. धुक्याची ओढणी

पहाटे राऊळी
आर्जवी भूपाळी
सोडा शय्या देवा
उठा वनमाळी

................... पहाटे दारात
................... सड्याचे शिंपण
................... रांगोळीने सजे
.................. अंगण अंगण

किलबिल कानी
जाग आली रानी
घुमे जात्यावर
मंजुळशी गाणी

..................पूर्व क्षितीजाशी
................. रेखिले गं कोणी
..................शुक्राचे गोंदण
.................. शशिच्या वदनी

रक्तिमा पूर्वेचा
शोभतो गालात
हासली गोडशी
गुलाबी पहाट

.................. धुक्यात सांडले
................. ऊन्हाचे आरसे
................. पहाटही वेडी
................. लावी बाई पिसे .......


- पुरंदरे.

वेध पहाटेचा



ढगाळलेल्या अस्मानाला,
वेध जणू रविकिरणाचा......
दगडामधल्या तृण फुलाला,
वेध सुगंधी मातीचा.......
दशदिशांत सुसाट वाऱ्याला,
रोखणाऱ्या शिखराचा.....
खळाळणाऱ्या सागराला,
वेध किनाऱ्याचा.....
ध्येयासक्त माणसाला,
वेध क्षितिजाचा....

जीवनाची पाऊलवाट,
अन मातीतल्या पाऊलखुणा....
कधी होईल पहाट,
हाच वेध मना....

अजुनही मला आठवतंय....................!!!!



आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं |
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं ||

... ... अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो |
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो ||

Canteen वाल्याला शिव्या
घालत बाहेरच्या café मध्ये जायचो |
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो ||

Library card चा तसा
कधी उपयोग झालाच नाही |
Canteen समोरच
असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत ||

चालु तासाला मागच्या
बाकावर Assignment copy करायचो |
ज्याची copy केली आहे
त्याच्या आधीच जाउन
submit करायचो ||

खुप आठवतात ते दिवस…!!

सोबत रडलेलो क्षण आठवले
की आज अगदी हसायला येते |
पण तेव्हा सोबत हसलेलो
क्षण आठवले की डोळ्यात
चटकन् पाणि येतं...||

पहाट



काळोखाच्या पटलावरती
उमटत आहे रंग प्रभेचे
उदासीनता टाकून सगळी
पक्षी छेडटी सूर विणेचे

दूरवरला उगा कालवा
पाणवठयावर लगबगला
कमरेवरती घागर घेऊन
पहा चालल्या त्या मधुबाला
सारे काही तेच तरीही
सारे काही नवे नवे
तेच क्षीतिज तीच लाली
सारे काही हवे हवे

बळीराजची पाऊलवाट
पुन्हा एकदा सळसळली
सर्जाच्या मग गळ्यात घंटा
पुन्हा एकदा कीणकीणली

सौंदर्याचा डेरा फुटला
सावल्यांचा मग खेळ सुरू
खुदकन ह्साला आणिक फसला
माळावरचा एक तरु

कारे तू मग उदास गड्या
का ठेवितो व्यर्थ अंतर
उधळ सारी हिरे माणके
जगणे आहे नितांत सुंदर