Friday, August 19, 2011

हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अगं रानी थांब मर्दिनी त्वांड फिरवुनी जाऊ नको ग
अंगत पंगत सांगतो गंमत मारक्या म्हशीगत बघु नको ग
अगं माझ्या रानी गं …

अहो सरकार स्वारी आली दारी तुकडा वोवाळुन टाकू का रं
अन्‌ उजेड पडलाय्‌ तुमचा म्हणुनी या सुर्व्याला झाकन झाकू का रं
अरं माझ्या राजा हे …

अगं साता नवसानं नवरा मिळला तरी बि उडतीस तीनताड गं
अन्‌ दुस-या देखत निंदा नव-याची बायको हायेस का भित्ताड गं
अगं माझ्या रानी गं …

आरं आपल्या त्वोंडानं कौतुक करिशी वांगी सोलून नाकानं रं
अन्‌ थरथर कापत लगीन केलंस आई बापाच्या धाकानं रं
अरं माझ्या राजा हे …

अगं वडील मंडळी पुढं दावला नम्रपणा मी लाखाचा
पर उभ्या गावाला माझा दरारा, दादा हाय मी लोकांचा !

हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

ह्यांनी रुपयं दिलंतं पंधरा नि ह्यांच्या अंगात नव्हता सदरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

रुपयं राहिलं चौदा नि ह्यांच्या घरात नव्हता सौदा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपयं राहिलं त्येरा अन्‌ ह्यांच्या न्हाणीत फुटका डेरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपयं राहिलं बारा अन्‌ ह्यांच्या भनीला नव्हता थारा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपयं राहिलं अकरा नि ह्यांच्या मेव्हणीचा भारी नखरा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता दहाची राहिली नोट नि ह्यांच्या घरात नव्हतं ताट
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपयं राहिलं नऊ नि मागल्या दारानं आली जाऊ
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपये राहिले आठ अन्‌ पडली माह्या दिराची गाठ
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपये राहिले सात न्‌ ह्यांच्या घरात नव्हतं जातं
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपये राहिले सहा नि पोलिस पाटलाला पाजला चहा
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपये राहिले पाच नि ह्यांच्या आरशाला नव्हती काच
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपये राहिले चार अन्‌ फुडल्या सोप्याचं मोडलंय दार
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपये राहिले तीन नि ह्यांच्या आईचं आला फोन
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

अहो रुपये राहिले दोन नि ह्यांच्या त्वोंडाला आली घान
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

आता रुपया राहिला एक नि म्या हा दत्तक घेतलाय ल्येक
तिथं एक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !

गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - कृष्णा कल्ले, बालकराम
चित्रपट - केला इशारा जाता जाता (१९६५)

No comments:

Post a Comment