Friday, August 19, 2011

मी रद्दी काढते

मी रद्दी काढते
बघता बघता वर्ष संपतं आणि सिल्याबस बदलतो
नव्याला जागा करायसाठी... मी रद्दी काढते

पुस्तकं नुकतीच लढाईवरून आलेली असतात
वह्यांना मात्र महिनाभर सक्तीचा आराम असतो
रोजच्या पाट्या टाकून पेपर ही कंटाळले असतात
त्यानाही राद्दीवाल्याच्या पोत्यात सुटकेचा मार्ग दिसतो

आधी कितीही रण गाजवलं असलं तरी
प्रत्येकाचा भाव ठरला असतो
आता यात वजनकाट्याच्या काय दोष..
जो तो आधीच वजनाने कमी भरलेला असतो!

किलो दर किलो ने वजनकाटा
कागदाचे ढीग चरू लागतो
आणि आपल्याला पाढे शिकवत
रद्दीवाला पोत भरु लागतो

हळूच डोकावतो एका पुस्तकाच्या पानातून
एक कागदाचा चिटोरा...
तिला द्यायचा राहून गेलेला
किंवा एखाद वेळापत्रक
त्याच्या रकान्यातून धावायचा
खूप खटाटोप केलेला !

सहज उलटताना वहीत दिसतं
गणिताच्या सरांचं टक्कल
गोळा-फुलीच्या मध्ये मध्ये
दिसते पाजळलेली अक्कल !

आता अर्धा-पाव किलोतून लक्ष उडते
आणि काळाची पाने उलटू लागतात...
जाण्याच्या तयारीत असलेली पुस्तकं
मग हवीहवीशी वाटू लागतात...!

जुन्या आठवणींच्या रद्दीने
मनाचं पोत भरून जातं
एक कायमची जागा करून
आणि एक पुस्तक रद्दीत जातं ....

No comments:

Post a Comment