तुटत चाललीये आपली मैत्री
तुटत चाललीये आपली मैत्री
निसर्गाच्या प्रत्येक नियमाविरुद्ध
एकमेकांपासून विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या सागराच्या लाटा
प्राणवायू नसलेले श्वास आणि
पाण्याच्या शोधापासून दूर चाललेली वटवृक्षाची मुळं
तुटत चाललीये आपली मैत्री
निसर्गाच्या प्रत्येक नियमाविरुद्ध
कधी हक्काचा वाटणारा आवाज,कधीच आसमंतात विरून गेलाय
आणि ते रागावण्यातल प्रेम ;छे ! प्रेम नव्हतंच कदाचित
चावून संपवलेली एखादी गोड कॅडबरी…. जशी आपली मैत्री
आणि चवीचा गंधही नसलेलं कॅडबरीचं कव्हर ...जसा मी
तुटत चाललीये आपली मैत्री
निसर्गाच्या प्रत्येक नियमाविरुद्ध
दोघांनी मिळून उडवलेला ती पतंग वर वर आणि वरच गेला
गुरुत्वाकर्षणाविरुद्ध !!
पौर्णिमेलाही काळभोर असणारं आभाळ !! का ?
तर आपल्या खोट्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये म्हणून !
माझ्या अतिप्रीत किरणांना
तुझ्यापाशी अडवणारा ओझोनचा थर
घट्ट आणि घट्टच होत चाललाय
तुटत चाललीये आपली मैत्री
निसर्गाच्या प्रत्येक नियमाविरुद्ध
No comments:
Post a Comment